ज्याप्रमाणे गुणाकार म्हणजे परत परत केलेली बेरीज त्याचप्रमाणे भागाकार म्हणजे परत परत केलेली वजाबाकी होय. (ही क्रिया समजावून देणारे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन डाउनलोड करुन पहा.)
समजा आपल्याला 7 लाडू 3 मुलांमध्ये सारखे वाटायचे आहेत. आपण काय करु? एक एक लाडू प्रत्येकाला देउ. असे तीन लाडू देउन संपले, उरले किती 7 - 3 = 4. अजून एक एक लाडू आपण देउ शकतो. उरले 4 - 3 = 1. म्हणजे प्रत्येकाला दोन लाडू आले आणि एक लाडू शिल्लक उरला.
म्हणून असे म्हणायचे की 7 ÷ 3 याचे उत्तर = भागाकार 2, बाकी 1.
17 ÷ 5 याचे उत्तर = भागाकार 3, बाकी 2.
दरवेळी अशा वजाबाक्या करीत राहणे सोयीचे आहे का? तर नाही. मग 7 लाडू 3 मुलांमध्ये वाटायचा प्रश्न अजून कोणत्या प्रकारे सोडविता येईल? तीनचा पाढा म्हणायला सुरुवात करा. 7 पेक्षा मोठी संख्या पाढ्यात आली की थांबा. त्या संख्येच्या अलिकडची संख्या विचारात घ्या. ती संख्या पाढ्यात ज्या स्थानावर आली ती संख्या म्हणजे भागाकार. आणि पाढ्यात आलेली संख्या 7 मधून वजा करुन उरलेली ती बाकी. पायरीपायरीने ही क्रिया करु.
- 3 चा पाढा म्हणू, 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9. 9 ही संख्या 7 पेक्षा मोठी आहे. थांबू.
- 9 च्या अलीकडील संख्या विचारात घेउ. ती म्हणजे 6.
- 6 ही संख्या 3 च्या पाढ्यात दुस-या स्थानावर आली आहे, म्हणून भागाकार 2.
- 6 ही संख्या 7 मधून वजा करु. उरला 1. ती बाकी.
17÷ 5 हा भागाकारही याचप्रकारे करुन पाहू.
- 5 चा पाढा म्हणू. 5 एके 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. 20 ही संख्या 17 पेक्षा मोठी, म्हणून थांबू.
- 20 च्या अलिकडील संख्या विचारात घेउ, ती म्हणजे 15.
- 15 ही संख्या 5 च्या पाढ्यात तिस-या क्रमांकावर आहे, म्हणून भागाकार 3.
- 15 ही संख्या 17 तून वजा करु. उरले 2. ती बाकी.

No comments:
Post a Comment